Vasota Fort Beyond Imagination👍 किल्ले वासोटा जंगल भ्रमंती👌

वासोटा
किल्ल्याची ऊंची : ४२६७
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
डोंगररांग: बामणोली, सातारा
जिल्हा :
श्रेणी : मध्यम
महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोर्‍य़ात, निबिड अरण्यात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’. ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ’आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ’व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच शिवसागर जलाशयात येत असल्यामुळे हा भाग दुर्गम बनलेला आहे, तसेच वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.त्यामुळेच वासोटा किल्ल्याची भेट वैशिष्ट्यपूर्ण ठरते. वासोटा – नागेश्वर हा शरीर – मनाची कसोटी पाहाणारा ट्रेक एका दिवसात करता येतो.

इतिहास :
वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ’वसंतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते, पण ते खरे नाही जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले. पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठदहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.

भूगोल :
पहाण्याची ठिकाणे :
वासोटा किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यात पायर्‍या लागतात. या पायर्‍यांपासून उजव्या बाजूला एक पायवाट जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक दरवाजा दिसतो. या दरवाजाजवळ एक हत्तीचे शिल्पही पडलेले दिसते.हा दरवाजा पाहून परत पाय‍र्‍यांनी वर चढल्यावर आपण वासोटा किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजाने गडावर प्रवेश करतो. वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी दोन दरवाजे होते. यातील पहिला दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. दुसर्‍य़ा दरवाजाने गडावर प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचं बिन छपराचं मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते.येथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पूढे ही वाट कड्यापाशी जाते येथून नागेश्वर व कोकणाचे दर्शन होते. परत मारुती मंदिरापाशी येउन उजव्या बाजूस जाणारी वाट पकडावी ही वाट ’काळकाईच्या ठाण्याकडे’ जाते. या वाटेवर पहिल्यांदा डाव्या हाताला एक मोठा तलाव दिसतो.या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्याबाजूची वास्तू पाहायला मिळते. येथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. या माचीला पाहून लोहगडच्या विंचूकाट्याची आठवण येते. या माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. या माचीवरून दिसणारा आजुबाजूचा घनदाट झाडांनी व्यापलेला प्रदेश, चकदेव, रसाळ, सुमार, महिपतगड, कोयनेचा जलाशय हा संपूर्ण देखावा मोठा रमणीय आहे.

काळकाईचे ठाणे पाहून पुन्हा मारुतीच्या देवळापाशी आल्यावर डावीकडे जाणार्‍या वाटेवर एक चुन्याचा घाणा पडलेला आहे. पुढे गेल्यावर जोड टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि आपण बाबु कड्यापाशी येऊन पोहोचतो. या कड्याचा आकार इंग्रजी ’यू’ अक्षरा सारखा आहे. याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्याची आठवण येते. या कड्यावरून समोरच दिसणारा आणि आपले लक्ष वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच ‘जुना वासोटा’ होय.

Leave a Reply