Home >> #jindadil_treakers Trek1- Raigad

#jindadil_treakers Trek1- Raigad

Monday, June 5th, 2017 | mumbai hiker | Raigad

किल्ले रायगड… स्वराज्याची राजधानी… मराठ्यांच्या अभिमानाचा मानबिंदू… भुईसपाट जागेवरती गंगा, यमुनेसारख्या नद्यांच्या सुपिक काठावर ताजमहाल बांधणे तर खुप सोपे असते,पण सह्याद्रीच्या काळ्या कातळाची छाती फ़ोडुन तिथे अभेद्य आणि अजिंक्य असे किल्ले बनवण्यासाठी अंगात रग, सिंहाचं काळीज आणि मनगटात जोर असावा लागतो. इथला प्रत्येक बुरुज घडवण्यासाठी कोणाचंतरी रक्त सांडलेलं असतं, इतिहासातील अनेक रक्तरंजित कहाण्यांचा साक्षीदार असलेला किल्ला काळचे घाव सोसुनसुद्धा दिमाखात उभा असतो… अशा गडाविषयी कितीही लिहिलं तरी शब्द अपुरे पडतील… अशा किल्य्यावर जाण्याची संधी मिळणे आणि सोबत मित्रांची साथ असणे म्हणजे दुग्धशर्करा योग म्हणायचं…कितीही मनात असलं तरी गेल्या महिनाभरापासून बेत तडीस जात न्हवता पण शेवटी २५ तारखेला भले एक सुट्टी मारून का होईना योग जुळून आला आणि जिंदा(दि)ल ट्रेकर्स ची पहिली चढाई ठरली… नियोजित जागी पोचलो तर फक्त Abhishek More आणि Jagdish Jadhav निवांत चहा घेत उभे! दिलेल्या वेळी चुकूनही पोचू नये हा नेहमीच शिरस्ता पाळत आमचे मावळे Er Swapnil Umrikar Milind Patil Sandip Borgaonkar Amith Shinde Nilesh Kulkarni अर्ध्या पावन्या घंट्याच्या उशिराने का होईना “अगदी वेळेवर आलोय” असं सांगत गाडीत बसले, वडखळला Vijay Mane ना सोबत घेऊन न्ह्याहारी उरकली आणि शुभारंभाचा नारळ फोडून गाडी थेट रस्त्याला लागली.. अधे मध्ये गाणी “कोकलत” “आणि फोटो काढत सरतेशेवटी मुक्कामी पोचलो तेंव्हा सूर्य मस्तपैकी डोक्यावर आला होता,सकाळची शिबंदी पोटात कधीच जिरल्यामुळे थोडीफार भूक लागली होती आणि तरीही गड चढल्याशिवाय जेवण करायचं नाहि असा ठाम निश्वय (किमान मी तरी ) केला असल्याने हर हर महादेव ची गर्जना करून त्या १६०० पायऱ्या चढण्यास सुरुवात केली. कितीही वर चढलो तरी अगदी टोकापर्यंत आमचे “जाणकार लोक” अरे अजून फक्त ५०% चढून झालाय हेच बोलत होते! मजल दरमजल करत गडावर पोचलो तेंव्हा अगदी सपाटून भूक लागली होती, म्हणून तिथल्याच एका स्थानिक काकूंना ९ लोकांच्या झुणका भाकरकरून ठेवायला सांगितल्या आणि मग त्या धुकं दाटलेल्या रम्य परिसरात यच्छेद्य भटंकती केली… जिथे नजर जाईल तिथे खिळून राहत होती… हिरव्याकंच शालूत लपलेला कातळ आणि पांढरे धुके… दरबारात पोचून “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” म्हणताना अंगावर आलेले शहारे आणि समाधीपुढे नतमस्तक होताना भरून दाटून आलेला ऊर…जगदीश्ववरच्या मंदिरात तर याच ठिकाणी कधी महाराज तासंतास स्वराज्याच्या पुढच्या मार्गक्रमेवर चिंतन करत असतील या विचाराने श्वास फुलून गेले सर्वांचे.. आणि सरते शेवटी पोटाच्या हाकेला व देऊन आम्ही झुणका भाकरी खाऊन आणि खूप सगळ्या आठवणी (+फोटो) घेऊन रोप वे ने पायथ्याशी आलो आणि मोहीम फत्ते झाली!
इतिश्री…
पुढची मोहीम लवकरच आखण्यात येईल… ती सुद्धा अशीच सिद्धीस जावो हि श्री चरणी प्रार्थना…
हर हर महादेव!

Leave a Reply